जिल्हा रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करा; नगरसेवक समीर ठाकूर आक्रमक
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये हिमोफेलियाग्रस्त बालकांना अत्यावश्यक उपचारासाठी माणगावपर्यंत धाव घ्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. अलिबागमध्येच इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून उपचार व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक समीर मधुकर ठाकूर यांनी केली असून, या प्रश्नावर आरोग्य प्रशासनाची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.
अलिबाग तालुक्यातील हिमोफेलियाग्रस्त बालकांच्या उपचाराचा प्रश्न गंभीर बनला असून, अत्यावश्यक इंजेक्शनसाठी रुग्णांना माणगाव येथे जावे लागत असल्याने पालकांची मोठी गैरसोय होत आहे. अलिबाग तालुक्यातील सुमारे 15 ते 20 हिमोफेलियाग्रस्त बालके, त्यामध्ये निलेश मोकल यांची निहाल आणि रुद्र ही मुलेही आहेत.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी शासनाच्या नियमानुसार हिमोफेलिया उपचार केंद्र माणगाव येथे मंजूर असल्याने अलिबागमध्ये रुग्ण आल्यास तेथून इंजेक्शन मागवून उपचार केले जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या स्पष्टीकरणावर अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक समीर मधुकर ठाकूर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्षात रुग्णांनाच उपचारासाठी माणगावला पाठविले जाते, असा दावा त्यांनी केला. हिमोफेलियाग्रस्त बालकांना महिन्यातून एक-दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागते. अशा वेळी लहान मुलांना घेऊन वारंवार माणगावपर्यंत प्रवास करणे गरीब पालकांसाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा भार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथेच हिमोफेलियासाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आणि इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अलिबाग येथील पालक निलेश राजू मोकल यांनीही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करून अलिबागमधील रुग्णांसाठी स्थानिक स्तरावर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग अलिबागमध्ये स्वतंत्र हिमोफेलिया केंद्र किंवा इंजेक्शन साठ्यास मंजुरी देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
समीर मधुकर ठाकूर,
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असताना हिमोफेलियाग्रस्त बालकांना उपचारासाठी माणगावला पाठविणे योग्य नाही. रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयातच इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा आणि उपचार व्यवस्था तातडीने सुरू करावी.
नगरसेवक
