तळा बस स्थानकाची समस्या सुटणार तरी कधी ?

एसटी महामंडळाचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

| तळा | वार्ताहर |

समस्येने ग्रासलेल्या तळा बसस्थानकाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने तळा बसस्थानकाची समस्या सुटणार तरी कधी, असा प्रश्‍न आता तळावासीयांना पडला आहे. तळा तालुक्यात एसटी हे दळणवळणाचे एकमेव साधन असून दिवसभरात जवळपास 80 ते 85 एसटीच्या फेर्‍या सुरू असतात. त्यामुळे तळा बसस्थानकात प्रवाश्यांची नेहमी वर्दळ असते मात्र स्थानकात अनेक सोयीसुविधांची कमतरता असल्याने बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अपुर्‍या जागेमुळे बस वळवताना अडचणी येतात. लगतच रहिवाशी वस्ती असल्याने अनेकजण बसस्थानकात खासगी गाड्या उभ्या करतात. त्यामुळे प्रवाशांची पुरती गैरसोय होते. बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने बसमध्ये चढताना उतरताना प्रवाशांना कसरत करावी लागते. काही ठिकाणी कातळाचे मोठमोठे उंचवटे आहेत. त्यात अपुरी जागा असल्याने गाडी चालवताना वळवताना चालकांची दमछाक होते. मध्यंतरी एसटी स्थानकातील संरक्षण भिंत तुटल्याने मच्छी विक्रेती महिला जखमी झाली होती. मात्र तेव्हापासून भिंतीची डागडुजी झालेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना विकतच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. बसस्थानकात आसनव्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे, मात्र त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दोन हजार प्रवाशांची वर्दळ
तालुक्यासह ग्रामीण भागातील जवळपास 400 विद्यार्थी दररोज एसटीने प्रवास करतात, तर कामानिमित्त येणार्‍या दैनंदिन प्रवाशांची संख्या दीड हजाराच्या घरात आहे. बसस्थानकातील आसन व्यवस्थाही मोडकळीस आल्याने प्रवाशांची गैरसोय होते.

बस स्थानकातील फेर्‍या
1) तळा बसस्थानकात माणगाव आगाराच्या तीन गाड्या असून त्यांच्या 19 फेर्‍या दररोज होतात.
2) रोहा आगारातील 4 ते 5 गाड्या धावत असून 55 फेर्‍या होतात.
3) श्रीवर्धन आगारातून चार बस, तर मुरूड़ आगारातील बसच्या चार फेर्‍या तळा बसस्थानकातून होतात.
4) लांब पल्ल्याच्या 4 गाड्यांमध्ये सकाळी वाशी-मुंबई सकाळी 6.25, तळा- रोहा पनवेल 10.30 वाजता सुटते.
5) तळेगाव- तळा- मुंबई बस दुपारी अडीचदरम्यान, तळा-बोरिवली दुपारी 3.30 वाजता चार गाड्या धावतात.

तळा बसस्थानकात पाणपोई नाही. कॉक्रिटीकरणाचा विषय हा रोहा आगाराच्या अधिन आहे. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

प्रशांत मादुस्कर
विभाग नियंत्रक, तळा
Exit mobile version