| माथेरान | वार्ताहर |
विविध शासकीय खात्यांची त्याचप्रमाणे पर्यावरण वाद्यांच्या कचाट्यात अडकलेल्या आणि नेहमीच आवश्यक विकास कामांना होत असलेला विरोधामुळेच माथेरानमध्ये आजतागायत विकासाची गंगा येण्यासाठी विलंब होत आहे. नेहमीच्या रहदारीच्या मुख्य महात्मा गांधी मार्गावर पर्यटकांना चालण्यासाठी सुस्थितीत रस्ते नसल्याचे विदारक चित्र आणि किरकोळ अपघात होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.
माथेरानमधील धूळ विरहित रस्त्यांना आणि मातीची धूप होऊ नये यासाठी एकमेव उत्तम पर्याय म्हणून सनियंत्रण समितीच्या परवानगीने दस्तुरी नाक्यापासून ते पांडे रोड आणि गावातील काही ठिकाणी मातीचेच क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले आहेत. परंतु, मुख्य मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने आणि काही निकृष्ट दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉक्सचा वापर करण्यात आल्यामुळे कच्चे ब्लॉक्स पावसाळी पाण्यात विरघळून गेल्याने बहुतांश ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना अंदाज येत नसल्यामुळे ब्लॉक्सच्या खड्ड्यात पाय मुरगळून नेहमीच किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भले येथील बहुतांश महत्वाकांक्षी कामे न्यायप्रविष्ट असली तरी सुद्धा ज्या गावातील रस्त्यांचे साधे खड्डे बुजवू शकले जात नाहीत. ते गाव विकसनशील पर्यटनक्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते का, असाही प्रश्न पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे.






