अलिबागची पाणी योजना अडकली कुठे?

पंडित पाटील यांचा सवाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा या शहरांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असताना या ठिकाणी अद्यापपर्यंत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली नाही. ती अडकली कुठे, असा संतप्त सवाल माजी आ. पंडित पाटील यांनी मुख्याधिकारी अंगाई सांळुखे व जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी विचारला आहे. पाणीपुरवठा योजना जाणीवपूर्वक थांबण्याचा सरकार का प्रयत्न करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी वेगवेगळी सरकारी कार्यालये असून, मान्यताप्राप्त अधिकाऱ्यांची घरेदेखील आहेत. पर्यटकदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. 2011 च्या जनगणनेनुसार, अलिबाग शहराची लोकसंख्या 20 हजार होती. वाढत्या नागरीकरणाबरोबरच पर्यटनामुळे अलिबाग शहराची लोकसंख्या वाढली आहे. मात्र, अलिबाग शहरातील नागरिकांना आजही टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या जात आहेत. मात्र, अलिबाग शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर का केल्या जात नाहीत, असा सवाल श्री. पाटील यांनी केला आहे.

गेल्या वर्षभरापासून अलिबाग नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी गरज नाही, तेथे करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु, आवश्यक त्याठिकाणी निधी खर्च का केला जात नाही, असा संतप्त सवाल माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष का केले आहे, पाण्याची योजना नक्की कुठे अडकली, असा प्रश्न पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version