| पेण | प्रतिनिधी |
पेण सराफ सुर्वणकार असोसिएशन मार्फत पेण जैन हॉल येथे कौटुंबिक वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पांढरे म्हणाले की, आज समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. कारण परस्परांबद्दल आपलेपणा जपल्याने समाज बलाढ्य होत असतो आणि आज व्यवसायिकदृष्टया पाहिल्यास सराफ असोसिएशनची एकी हीच त्याची ताकद आहे. जे आनंदी जिवन जगतात ती नेक माणसं असतात. कुटुंबा समवेत एक दिवस का होईना धंद्याचा ताणतणाव दुर ठेवून परस्परात आनंद वाटला जातो. आज सर्व रोगांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे आनंद. आणि ही असोसिएशन आनंदाची देवाण-घेवाण करत आहेत.
यावेळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले की, पेणमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मला एका कौटुंबिक कार्यक्रमाला बोलवून सुवर्णकार असोसिएशन ने त्यांच्या कुटुंबाचा सदस्य केला आहे. भविष्यात या कुटुंबावर कोणतेच संकट येणार नाही यासाठी मी सदैव प्रयत्नशिल असेल. ॲड. महेश देसले यांनी कायदेविषयी मार्गदर्शन केले. तर, संतोष पाटील यांनी सुवर्णकारांना अनंद विकणारी गोड माणसं असा उल्लेख केला.