पंडित पाटील यांचे प्रतिपादन
| रोहा | प्रतिनिधी |
सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेशी असलेल्या बांधिलकी मधून शेतकरी कामगार पक्ष सामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटत असतो असे प्रतिपादन माजी आमदार पंडीत पाटील यांनी भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाघीरपट्टी येथील जलजीवन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर मुरुड तालुका चिटणीस अजित कासार,रोहा तालुका कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष नंदेश यादव, उपाध्यक्ष संतोष दिवकर,मुरुड सुपारी संघाचे संचालक विकास दिवेकर यांच्या सह धनगर समाजातील मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित पाटील पुढे म्हणाले की, भालगाव ग्रामपंचायत शेकापच्या ताब्यात नाही. येथील आमदार, खासदार आमच्या पक्षाचा नाही.पण पाच वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवाराला जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान केले यामुळे गावातील विकासकामे मार्गी लागली आहेत. गावात येणार्या रस्त्याचा काही भाग डांबरीकरण, स्मशानभूमीत शेड,नवीन अंगणवाडी ही कामे पूर्ण झाली असल्याचेही त्यानी नमूद केले.
नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन देखील पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच प्रमाणे गावातील महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. तसेच समाजमंदिर व अंतर्गत रस्ता या कामांचे भूमिपूजन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. गावातील सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी शेकाप प्रयत्नशील राहील असे देखील पाटील यांनी सांगितले.