| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-अंबिवली येथील बंद असलेल्या बंगल्यांत दरोडा टाकण्यासाठी गेलेल्या अट्टल चोरांचा डाव ऐनवेळी फसला. चोरी करण्याअगोदरच ग्रामस्थांना चाहूल लागल्याने त्यांनी चोरांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांना थेट नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना नुकतीच घडली. चोर पळून जात असतानाच ग्रामस्थांनी दोघांना पकडले; तर एक जण पसार झाला.
नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरळ-अंबिवली येथील पेशवाई मार्गावर मुंबईस्थित महेंद्र लापशिया व विजय लापशिया यांच्या मालकीचे दोन बंगले आहेत. हे बंगले सध्या बंद अवस्थेत असून, येथे स्थानिकांना देखभालीसाठी सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवले आहे. दीपावली पाडव्याच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास तीन चोरांनी येथील एक बंद बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्यांनी चोरीसाठी लागणारे साहित्य बॅगमध्ये भरून आणले होते. खिडक्यांच्या काचा फोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. सुरक्षा रक्षकाला बंगल्यातून आवाज येत असल्याने त्याने सावध भूमिका घेत ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी बंगल्याला घेराव घातला. बाहेर काहीतरी गडबड असल्याचे समजताच चोरांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले. यात एक चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला.
चोरटे बिहार राज्यातील
जागरूक नागरिकांनी दोन चोरांना चोप देत नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले. सिराजूल मोहाब्बद फैझल आणि मोहाब्बद अक्तर नजमुद्दीन डेबोन अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. दोघेही मूळचे बिहार राज्यातील कठीयार जिल्ह्यातील राहणारे आहेत. सध्या अंबरनाथ येथे भाड्याने खोली घेऊन 10 ते 15 जण एकत्र राहतात. बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती दोघांनी दिली. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार भाऊ आघाण अधिक तपास करत आहेत.







