। उरण । वार्ताहर ।
पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्ये असलेला अलिबागचा पांढरा कांदा दरवर्षाप्रमाणे उरण बाजारात दाखल झाला आहे. नागरिक ह्या कांद्याला खरेदी करणे पसंत करीत असतानाचे चित्र उरण बाजारपेठेत दिसत आहे.
अलिबाग तालुक्यात कार्ले, खंडाळे, पवेळे, नेहुली, तळवली, खानाव-उसर, सोगाव -मारुती या परिसरात हा कांदा पिकवला जातो. रायगड जिल्ह्यात 250 हेक्टरवर पांढर्या कांद्याची लावगड होते. त्यापैकी एकट्या अलिबाग तालुक्यात 230 हेक्टरवर कांद्याची लावगड होते.
पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखट, चवीला गोड असल्याने पांढर्या कांद्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. कांद्याच्या माळी सध्या मोठ्या आकाराचे कांदे 200 ते 250 रुपये, तर लहान आकाराचे कांदे 150 ते 175 रुपये माळ या दराने विकले जात आहेत. सुटे कांदे 50 ते 80 रुपये किलो या दराने आम्ही उरण बाजारात विकतो असे अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील कांदा विक्रेत्या सुजाता अशोक पाटील यांनी सांगितले.