फेब्रुवारीत बाजारात दाखल होण्याची शक्यता
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा परिसरात उत्पादित होणाऱ्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा उशीर झाला आहे. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होणारी कांदा काढणी यावर्षी पावसाच्या लांबलेल्या कालावधीमुळे रखडली आहे. परिणामी, पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरवर्षी कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र, यंदा पावसाने जिल्ह्यात जास्त काळ मुक्काम केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली. त्यामुळे कांद्याची लागवड सुमारे पंधरा दिवस उशिरा झाली.या विलंबाचा परिणाम कांदा काढणीवरही झाला असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, 26 जानेवारीनंतर कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर कांद्याच्या माळी तयार करणे व बाजारात पाठविण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने फेब्रुवारीतच हा कांदा बाजारात दाखल होईल, असे सांगण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील कार्ले परिसरातील पांढऱ्या कांद्याला चव आणि गुणधर्मांमुळे विशेष मागणी असते. रायगड जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई आणि पुणे येथून या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. यंदा पांढरा कांदा बाजारात सुमारे पंधरा दिवस उशिरा दाखल होणार आहे.
-सतीश म्हात्रे,
पांढरा कांदा उत्पादक





