कोण आहेत हे लोक ?

उत्तर प्रदेश हे देशातील अत्यंत मागास राज्यांपैकी एक मानले जाते. अशिक्षितांची संख्या, लहान मुलांचे मृत्यू, दवाखान्यांच्या सोयी, रस्ते इत्यादींबाबत राज्याची आकडेवारी नेहमीच भयंकर असते. रोजगारांसाठी तिथले लोंढे मुंबई-दिल्लीकडे येत असतात. असे असले तरी या राज्यामधून सतत येणार्‍या बातम्या या सदरच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करणार्‍या वा मार्ग काढणार्‍या नसतात. तर अमुक ठिकाणी पूजेला परवानगी हवी, तमुक ठिकाणी पूर्वी मंदिर होते अशा मागण्या व दावे करणार्‍या असतात. देशातले बहुसंख्य लोक महागाईने पोळलेले असताना आणि रोजगार, पाणी, दुष्काळ किंवा शेतमालाचे अतिउत्पादन अशा प्रश्‍नांंनी गांजलेले असताना उत्तर प्रदेशातील काही लोकांना मात्र भलत्याच प्रश्‍नांमध्ये रस आहे असे दिसते. कोण आहेत हे लोक? हे लोक जगण्यासाठी काय कामधंदा करतात? कोरोनामध्ये या लोकांचे कोणी कुटुंबीय बळी पडले नाहीत काय? यांच्या आमदनीवर काहीच परिणाम झाला नाही काय? गुरुवारी एकाच दिवशी काशी, मथुरा, आग्रा अशा विविध ठिकाणांशी संबंधित खटले न्यायालयात सुनावणीला आल्याने त्यांच्या बातम्या झाल्या. ताजमहालाच्या वास्तूतील वीस बंद खोल्या उघडण्यात याव्यात ही याचिका उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. ही याचिका दाखल करणारे गृहस्थ डॉक्टर रजनीश सिंह भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहेत हे ठाऊक नाही. पण उत्तर प्रदेशात ऑक्सिजनअभावी लोक मरत होते किंवा मेंदूज्वराने मुले मरत होती तेव्हा या डॉक्टरांनी न्यायालयात धाव घेतल्याचे ऐकिवात नाही. ताजमहाल हा तेजोमहाल होता व तेथे पूर्वी मंदिर होते अशा स्वरुपाचे दावे हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक पूर्वीपासून करीत आलेले आहेत. पुण्याचे पु. ना. ओक नावाचे स्वतःला इतिहासकार म्हणवून घेणारे गृहस्थ मराठीतल्या हिंदुत्ववाद्यांमध्ये एकेकाळी प्रसिध्द होते. ते हा दावा करीत. याचिकाकर्ते हे त्यांचेच भाऊबंद आहेत. हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा मंदिराचे अवशेष आढळलेले असल्यानेच या वीस खोल्या कायमच्या बंद ठेवण्यात आल्या आहेत असे संशयाचे वातावरण हे सर्व लोक पूर्वीपासून निर्माण करीत आले आहेत. पण या गोष्टींची चर्चा किंवा चिकित्सा करण्याचे न्यायालय हे ठिकाण नव्हे असे सांगून अलाहाबाद कोर्टाने सिंह यांना फटकारले ते बरे झाले. ‘अयोध्ये’नंतर अशा खटल्यांचा आपल्या बाजूने निकाल करून घेता येईल अशी आशा अनेक लोकांमध्ये बळावली आहे. ‘अयोध्ये’चा निकाल ज्या रीतीने लागला व तो देणार्‍या न्यायाधीशांनी नंतर ज्या रीतीने राज्यसभा स्वीकारली त्यामुळे त्या आशेला अधिक बळकटी मिळाली होती. पण अमुक एक वास्तू पूर्वी काय होती किंवा तेथे काय अवशेष आहेत हे न्यायालय ठरवू शकणार नाही हे कोर्टानेच स्पष्ट केले हे बरे झाले. सर्वात कहर म्हणजे ज्या खोल्यांच्या निमित्ताने इतके फुटेज खाण्यात आले त्या कधीही पूर्ण बंद नव्हत्या असा खुलासा पुरातत्व संशोधन संस्थेतर्फे करण्यात आला आहे. अगदी अलिकडेच या सहा लाख रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात आली व त्यासाठी त्या उघडण्यात आल्या होत्या असेही संस्थेने म्हटले आहे. शिवाय ताजमहालामधील आजवरच्या संशोधनामध्ये कोठेही मूर्ती किंवा हिंदू अवशेष आढळलेले नाहीत असेही संस्थेने निःसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे. काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेचे कृष्णजन्मस्थान यावरूनही असेच विविध वाद आणि विविध याचिका दाखल झाल्या आहेत. हे सर्व करणार्‍या लोकांकडे भरपूर वेळ व पैसा आहे किंवा त्यांना कोठून तरी पैसे पुरवले जात आहेत हे उघड आहे. आश्‍चर्य म्हणजे असल्या लोकांच्या नादाला लागून काही मराठी पुढार्‍यांनीही अयोध्या पर्यटन हा चर्चेचा विषय बनवला आहे. दुसरीकडे मुस्लिमांचे पुढारी म्हणवणारे लोकही त्यातलेच आहेत. एमआयएमचे नेते अकबरुद्दिन ओवैसी यांनी औरंगाबाद दौर्‍यात औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकून जाणीवपूर्वक नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. या देशातला बहुसंख्य हिंदू आणि मुसलमान असंख्य प्रश्‍नांंनी पिचलेला असताना अशा गोष्टींवर वायफळ खर्च आणि राजकारण करणे म्हणजे खरे तर त्याची क्रूर चेष्टा आहे.

Exit mobile version