आपण कोण आहोत?

एखादी गोष्ट सतत म्हटली की ती खरी वाटते. जसे की, महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सतत ऐकतो आणि म्हणतोदेखील. त्यामुळे आपल्याला वाटू लागते खरेच तसे आहे. पण मधूनच दौंडमधील सात जणांचा खून झाल्याचे किंवा लग्नाला विरोध असल्याने बापानेच पोटच्या पोरीला खलास केल्याचे नांदेडचे प्रकरण समोर येते. आपल्या पुढारलेपणाविषयी शंका येते. दौंड-पारनेरच्या प्रकरणात आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून खून आहे अशा संशयातून आपल्याच चुलत भावाच्या कुटुंबातील सात जणांना संपवण्यात आले. नांदेडमधील शुभांगी जोगदंड हिची कहाणी तर जिवाला चटका लावणारी आहे. शुभांगीने स्वतःच्या हुशारीच्या जोरावर नीट परीक्षा उत्तीर्ण केल्याने तिला आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. पण तिचा बाप जनार्दन जोगदंड याला त्याची किंमत नसावी. ठराविक वयात आणि जातीमध्येच तिचं लग्न झालं पाहिजे या कल्पनेने तो पछाडलेला होता. शुभांगीचे दुसर्‍या कोणाशी संबंध असल्याने बापाने ठरवलेले लग्न होऊ शकले नाही. त्यातून चिडून जाऊन मुलाच्या मदतीने त्याने शुभांगीला संपवले. मराठी म्हणून आपण महात्मा फुले आणि आंबेडकरांचा वारसा सांगतो. सर्व माणसे समान असल्याची त्यांची शिकवण मानतो. 1848 साली मुलींसाठीची पहिली शाळा महाराष्ट्रात सुरू झाली हे आपण गौरवाने सांगतो. सावित्रीबाई फुले किंवा ताराबाई शिंदे यांनी एकोणिसाव्या शतकात जे केले त्याबद्दल अभिमान बाळगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी एकतृतियांश जागा राखीव ठेवण्याची कल्पनाही इथेच आकाराला आली असा इतिहास सांगतो. पण दुसरीकडे दौंडच्या पवार कुटुंबियांचे किंवा शुभांगीसारखे खून हेही अपवादाने नव्हे तर ठराविक नेमाने याच महाराष्ट्रात होत राहतात. याच वेळी दुसरीकडे बागेश्‍वर बाबांचीही चर्चा चालू आहे. हा अवघा 26 वर्षांचा इसम आपल्याला प्रचंड सिध्दी प्राप्त आहेत आणि लोकांच्या मनातले प्रश्‍नदेखील ओळखू शकतो असा दावा करतो. नुकताच त्याने नागपुरात मोठा दरबार भरवला होता. सर्वच माणसांच्या आयुष्यात काही न सुटणार्‍या अडचणी असतातच. गरिबांना तर त्या सर्वाधिक असतात. असे लोक या बाबासारख्या भोंदूंच्या जाळ्यात सापडतात. महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सशक्त काम आहे. सर्वसाधारण तरुणांमध्ये तिला पाठिंबा आहे.  या प्रश्‍नी आपल्याकडे कायदाही झाला आहे. तरीही असे बाबा सतत प्रसिध्दीत आणि चर्चेत येत राहतात. श्याम मानव यांनी या बाबाला चमत्कार सिध्द करण्याचे आव्हान दिले. पण त्यापासून तो पळ काढतो आहे. त्यातच पोलिसांनी बाबाकडून कोणतीही फसवणूक केलेली नाही अशी क्लिन चिट दिल्याच्या बातम्या आहेत. शिवाय, अंधश्रध्दा निर्मूलनवाले हे नेहमी हिंदू साधूंविरुध्दच का बोलतात असा तर्कदुष्ट प्रचार सोशल मिडियातून सुरू झाला आहे. लोकांना लुबाडणारा एखादा भोंदू हिंदू आहे म्हणून त्याला माफ करावे असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. खरोखर, महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावे काय?

Exit mobile version