। तळा । वार्ताहर ।
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी होऊनही 15 व्या विधानसभेला सामोरे जाताना सार्याच राजकीय पक्षांच्या प्रचाराची गाडी आजही वीज, पाणी आणि रस्त्यामध्येच अडकली. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांवर मात्र विकास म्हणजे काय रे भाऊ, नक्की कुणाचा विकास झाला? असा प्रश्न उमेदवारालाच विचारण्याची वेळ आली आहे.
तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर शहराचा विकास होईल, अशी स्वप्ने पाहणार्या नागरिकांच्या पदरी अडीच वर्ष होऊनही निराशाच पडली आहे. तळा नगरपंचायतीने तब्बल छत्तीस लाखांचे तीन जनरेटर चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी केले आहेत. पाणी पुरवठा करणार्या अंबेळी पंप हाऊस, धरण पंप हाऊस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील पाण्याची टाकी येथे हे तीन जनरेटर बसविण्यात आले आहेत. लाईट गेल्यानंतर या जनरेटरने नागरिकांना पाणी पुरवठा करता येईल, हा या मागचा उद्देश आहे. पण हे जनरेटर धूळ खात पडले आहेत. नागरिकांसाठी त्याचा काही उपयोग नाही. मग 36 लाखांच्या जनरेटरची खरेदी नक्की कोणासाठी? स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तळा नगरपंचायतीने विशेष फंडातून शहरातील कचरा संकलन करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले दोन ट्रॅक्टर धूळखात पडले आहेत. याचा उपयोग जनतेसाठी नाही, मग ही खरेदी कोणासाठी? 4 ते 5 महिन्यांपुर्वी तळा नगर पंचायतीला मिळालेली अग्निशमन गाडी शोभेची वस्तू ठरली आहे. शहरात व आजुबाजुच्या गावांमध्ये लागणार्या आगीवर नियत्रंण मिळविता यावे, यासाठी ही गाडी नगरपंचायतीला देण्यात आली. मात्र यावर चालक अन्य कर्मचारी नसल्याने हा बंब धुळखात पडला आहे. भविष्यात शहरात कुठे आग लागली तर या गाडीचा काही उपयोग नाही मग, अग्निशमन गाडी खरेदी कोणासाठी? सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021-2022 योजने अंतर्गत तळा नगरपंचायतीसाठी नव्वद लाख सत्तावीस हजार रुपयांची डिझेल विद्युत शवदाहिनी मंजूर करण्यात आल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात शवदाहिनी बसविण्यात आली आहे, परंतु गेली तीन वर्षे विजेवर चालणारी ही शवदाहिनी धूळ खात पडली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने शवदाहिनी उभारण्यासाठी केलेला नव्वद लाख सत्तावीस हजार रुपये खर्चही वाया गेला आहे. ही खरेदी कोणासाठी? 55 लाख रुपये खर्च करुन, तयार करण्यात आलेल्या तळा बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्याची डागडुजी नेहमीच सुरू आहे, पण मलमपट्टीचाही उपयोग होत नाही.
तळा नगरपंचायतीत नक्की कोणाचा झाला विकास?
