संसदेत धूर सोडणारा अमोल शिंदे आहे तरी कोण?

| मुंबई | प्रतिनिधी |
संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी करत लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडी टाकली होती. यानंतर दोघांनी सभागृहात पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी संसद भवनाच्या परिसरात त्यांच्या दोन साथीदारांनी स्मोक बॉम्ब फोडून घोषणबाजी केली होती. यामध्ये लातूरच्या अमोल शिंदे या तरुणाचा समावेश होता. सध्या अमोल शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात असून संसद भवनावरील घुसखोरीच्या या संवेदनशील प्रकरणामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे.

संसदेत घुसखोरी करुन धुराची नळकांडी फोडल्यामुळे अमोल शिंदे याच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे. मात्र, त्याने हे पाऊल का उचलले, यावरुन चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणात ट्विट करुन अमोल शिंदे याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमोलचे पालक आपल्या मुलाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमोल आम्हाला नेहमी म्हणायचा, पोलीस किंवा आर्मीच्या भरतीत माझं सिलेक्शन होईल, ही अपेक्षा होती. पण आता माझं वय संपलं. मला नोकरी लागली नाही. मी एवढं शिकलो त्याचा काय फायदा झाला, असे तो नेहमी घरात असताना बोलायचा. आम्ही त्याला एखाद्या कंपनीत नोकरी करायला सांगायचो. पण तो मला पोलीस आणि मिलिट्री भरतीसाठी प्रयत्न करायचे असल्याचे सांगायचा. अनेकदा तो म्हणायचा की, मला कोल्हापूर किंवा लातूरला शिकायला जायचं आहे. मला महिन्याला 4 हजार रुपये द्या पण आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते.

9 डिसेंबरला आमचं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं. तो भरतीच्या परीक्षेत रनिंगमध्ये पहिला यायचा. माझ्या मुलाने डाका घातला नाही किंवा कोणतीही चोरी, लबाडी केलेली नाही. पहिला नंबर येऊनही पोलीस भरतीत त्याची निवड झाली नाही. इतके दिवस रोजगार नाही तर तो काय करणार? त्यामुळे त्याने हे कृत्य केले असेल. आता तो वाचला तर येईल गावाकडे, मेलं तर मेलं तिकडे, अशी उद्विग्न भावना अमोलच्या पालकांनी बोलून दाखवली.

जितेंद्र आव्हाडांनी उचलून धरली अमोलची बाजू
जितेंद्र आव्हाड यांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांचा एक व्हिडीओ शेअर करत बेरोजगारीच्या समस्येविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही, हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो. त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी. आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय,असं ते सांगतायत. खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार? आज अमोलने जो गुन्हा केलाय,त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल. मात्र,ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

अमोल शिंदेला ॲड. असिम सरोदे करणार मदत
चार तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला अन्‌‍‍ याचे पडसाद देशभरात उमटले. लातूरमधल्या झरे गावातील तरूण अमोल शिंदे या सगळ्या प्रकारात सामील होता. या अमोल शिंदेला ॲड. असिम सरोदे कायदेशीर मदत करणार आहेत.

Exit mobile version