शेतकरी कामगार पक्षाचा संतप्त सवाल
| अलिबाग | प्रतिनिधी |
नवजात बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून, यामागे केवळ अपघाताचे कारण पुढे करून प्रशासनाला जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच निष्पाप बालकांचा बळी गेला असल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त भूमिका शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे.
सरकारी रुग्णालयांवर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठा विश्वास असतो. खासगी रुग्णालयांचा वाढता खर्च परवडत नसल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे उपचारासाठी शासकीय रुग्णालयांचा आधार घेतात. अशा परिस्थितीत रुग्णालयातील सुरक्षिततेच्या व्यवस्थेतच त्रुटी असतील आणि त्याचा परिणाम नवजात बालकांच्या जीवावर होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे.
घटनेनंतर केवळ चौकशी समिती स्थापन करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करू नये. चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून दोषींना वाचविण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असेल, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. प्रशासनाने या घटनेची पारदर्शक चौकशी करून घटनेमागील नेमकी कारणे जनतेसमोर आणावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा शेतकरी कामगार पक्ष या प्रश्नावर गप्प बसणार नाही. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.
अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू होणे ही अत्यंत संतापजनक घटना आहे. नवीन इमारती आणि आरोग्य सुविधांचे दावे करणाऱ्या सरकारला साधे अग्निसुरक्षा परीक्षण आणि विद्युत यंत्रणेची तपासणी करता आली नाही, ही गंभीर बाब आहे. ही घटना केवळ अपघात म्हणून झटकून चालणार नाही. दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृत बालकांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष
