आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा परिवार हा शिस्त व सुविहित नियोजनासाठी प्रसिध्द आहे. मात्र आप्पासाहेबांना महाराष्ट्रभूषण प्रदान करण्याच्या कार्यक्रमानंतर तेरा श्रीसदस्यांचा मृत्यू व्हावा आणि शेकडो जण आजारी पडावेत हे दुर्दैवी व धक्कादायक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा परिवार आप्पासाहेबांचे भक्त आहेत. त्यांनी आपल्या गुरुकडे हा कार्यक्रम करण्याचा हट्ट केला व शेवटी तो मानावा लागला असे म्हणतात. मात्र ते करताना नियोजनात सरकारी पध्दतीची हलगर्जी झाली. एप्रिलच्या भयंकर तळपत्या उन्हात भर माध्यान्ही हे लोक जमले. असंख्य लोक एक दिवस आधीपासूनच जागा पकडण्यासाठी आले होते. या सर्वांची व्यवस्था करणे ही कसोटी होती. अंतिमतः होऊ नये ते झाले. काही जणांचा मृत्यू झाला व काही जण अजूनही गंभीर आजारी आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घेता येऊ शकला असता असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तो कोणाच्या सोईने वा सांगण्यावरून भर दुपारच्या उन्हात आयोजित केला गेला का हे तपासायला हवे. कदाचित संध्याकाळच्या कार्यक्रमानंतर परतण्यासाठी दूरच्या भक्तांना उशीर होतो असाही विचार असू शकेल. पण आज ज्या घरांमधील माणसांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी हा हादरा आहे. हे सर्वच लोक एका आस्थेने तेथे आले असणार. व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांना जीव गमवावा लागावा हे दुःखद आहे. महाराष्ट्रभूषण प्रदानाचा कार्यक्रम एरवी राजभवनात किंवा बंदिस्त हॉलमध्ये होत असतो. पण आप्पासाहेबांवर प्रेम करणार्या लाखो लोकांना सामावून घेण्यासाठी कार्यक्रम मोठ्या मैदानात घेण्यात आला. आप्पासाहेबांबद्दल सर्वच राजकीय नेत्यांना आदरभाव आहे. पण त्यांच्या नावावर जमणार्या गर्दीविषयी त्यांना अधिक प्रेम असते हेही उघड गुपित आहे. खारघरमध्येही लाखोंची गर्दी जमेल व त्याचा आपल्याला फायदा होईल या राजकीय हिशेब वरचढ ठरलेला दिसतो. खुद्द एकनाथ शिंदेंपासून ते उदय सामंत, रवींद्र चव्हाण इत्यादी मंत्री हे या कार्यक्रमाच्या तयारीच्या पाहणीसाठी येऊन गेले होते. त्यावरून त्यांचा यात किती रस होता हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर यंत्रणेत ढिलाई व्हावी व त्यातून काही बळी जावेत हे खेदजनक आहे. उद्धव ठाकरे यांनी याबद्दल सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने तर राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. खरोखर, या प्रकरणाची चौकशी करून ज्या लोकांच्या ढिलाईमुळे हे मृत्यू झाले असतील त्यांना कडक शिक्षा केली जाण्याची गरज आहे.