। पेण । प्रतिनिधी ।
कांदळेपासून वडखळ नाक्यापर्यंतच्या रस्त्याला गेली तीन ते चार वर्षे वालीच उरला नाही. त्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून, हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
जरी मुंबई-गोवा महामार्ग वडखळ बायपास करून जात असला तरी वडखळमध्ये येण्यासाठी कांदळे गावापासून वडखळपर्यंत कांदळे, इंद्रनगर आणि वडखळ, नवेगाव, या गावांमध्ये जाण्यासाठी जुन्या रस्त्याचाच उपयोग करावा लागतो. परंतु, त्या रस्त्याची मालकी नक्की कुणाची याबाबत अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत आहेत. वडखळ सरपंच आणि सदस्यांनी याबाबीचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या हाती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकीकरणाचे एक पत्र पडले असून, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, वडखळ जुना रोड हा राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु, अधिकारी वर्ग मानायला तयार नाहीत. त्यावेळी वडखळ सरपंचासह सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून वडखळ जुन्या रस्त्याची करूण काहानी सांगितली. लगेच आमच्या प्रतिनिधीनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण निरंजन चौवरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता पहिल्यांदा त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. परंतु, ज्यावेळी कृषीवल प्रतिनिधींनी 30 एप्रिल 2024 च्या पत्रासंदर्भात विचारणा केली, त्यावेळी असे कोणतेच पत्र आमच्याकडे आलेच नाही. आमच्या कार्यालयाचा या रस्त्याशी संबंध नाही, अशा प्रकारे उत्तर दिली. परंतु, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकीकरणाचे पत्र पूर्ण वाचून दाखविल्यानंतर निरंजन चौवरे यांनी सांगितले की, मी कागदपत्र घेऊन फिरत नाही, पत्र आले असेल; परंतु मला माहीत नाही. या सर्व बाबींवरून अधिकारी वर्गाचा हलगर्जीपणा समोर येतोय. जर 30 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांना रितसर पत्र पाठवून वडखळ जुना रस्ता वर्ग केला असेल, तर आपली जबाबदारी का स्वीकारत नाहीत. त्यानंतर निरंजन चौवरे यांनी अभियंता सिंगासने यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. परंतु, अभियंता रुपेश सिंगासने यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्या अधिकार्यांविरूध्द कारवाईची मागणी केली असून, लवकरच वडखळचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहेत.







