यांचा बोलवता धनी कोण?

दिलीप भोईर विरुध्द राजा केणी वाद चव्हाट्यावर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात सध्या भाजप विरुध्द शिंदे गट शिवसेना यांच्यामधील वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विधानसभा निवडणूकीत कोण उभे राहणार यावरून भाजपचे दिलीप भोेईर व शिंदे गटाचे राजा केणी एकमेकांविरोधात भिडले आहेत. राजा केणी यांना विद्यमान आमदार महेंद्र दळवी तर दिलीप भोईर यांना भाजपची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते. या रस्त्याचे काम करून देणार या आश्‍वासनावर दळवी आमदार झाल्याची चर्चा आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे त्यांनी अनेकवेळा नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. परंतु, प्रत्यक्षात रस्ता चांगला झाला नाही. या खड्डेमय रस्त्यावर प्रवास करताना नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोेईर यांनी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करून घेण्याबाबत पत्र घेतले.

त्यानुसार मागील वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिलीप भोईर यांनी रस्त्याचे काम सुरु केले. त्यानंतर शिंदे गटाकडून दुसर्‍या दिवशी पुन्हा बेलकडे फाट्यावर या रस्त्याच्या कामाचा नारळ वाढविण्यात आला. त्यामुळे दळवी विरुध्द दिलीप भोईर यांचा श्रेयवाद गेली अनेक दिवस सुरुच होता. भाजपचे नेते सतिश धारप यांनी मध्यस्थीची भूमिका घेत हा वाद शांत केला. मात्र, पुन्हा भाजप विरुध्द शिंदे गट शिवसेना वाद सुरु झाला. दिलीप भोईर यांनी भाजप पक्ष वाढविण्यासाठी शिंदे गटातील शिवसेनेला भगदाड पाडण्यास सुरुवात केली. शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये येऊ लागले. नुकतीच शिंदे गटातील कार्यकर्त्याची बैठक अलिबागमध्ये झाली. या बैठकीत राजा केणी यांनी दिलीप भोईर यांना माकड बोलून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला. त्यामुळे दिलीप भोईर यांनी देखील केणी यांना महाचोर बोलून आसूड ओढला. कामाच्या नावाखाली खोटी बिले काढण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूकीत उमेदवार कोण, असा वाद या मित्र पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये सुरु आहे. तो वाद विकोपाला जाण्याची अधिक शक्यता सध्या तरी दिसत आहे.

Exit mobile version