17 ऑक्टोबरला निवडणूक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. याबाबतची अधिसुचना 22 सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. तर मतमोजणी 19 ऑक्टोबरला पार पडणार आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचं राजीनामा सत्र सुरू असताना ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान राबवली जाणार आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक एकमताने मंजूर करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी विनंती ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. हे वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान,या निवडणुकीत गांधी घराण्याचा अध्यक्ष होणार की अन्य कोण होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.राहूल हेच अध्यक्ष असतील,आम्ही त्यांचे मन वळवू,असे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.