मतदारसंघनिहाय 25 ते 27 फेर्या; मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभेच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, उद्या शनिवारी (दि. 23) निकाल जाहीर होणार आहेत. राज्यभरातील जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. राज्यातील 288 जागांसाठी 8272 उमेदवार आहेत. पैकी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहावयास मिळाली. त्यामुळे कोण होणार आमदार, कोणाचे स्वप्न साकार होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, मतमोजणीची तयार पूर्ण झाली असून, प्रशासनही सज्ज झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक, सहाय्यक, सुक्ष्म निरीक्षक, इतर पथकातील अधिकारी व कर्मचार्यांची कार्यशाळा शुक्रवारी घेण्यात आली. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघातील 24 लाख 88 हजार 788 पैकी 17 लाख 21 हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणी शनिवारी सकाळपासून सुरु होणार आहे. त्यामुळे काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर फेर्यानुसार इव्हीएम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी 25 ते 27 फेर्या होणार असून, प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोर, पनवेल ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होणार आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशासकीय भवन येथे होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जासई येथील दि.बा. पाटील मंगल कार्यालय येथे होणार आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी खंडाळेमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे होणार आहे. महाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड बहुउद्देशीय सभागृह येथे होणार आहे.
मतमोजणीची तयारी पूर्ण
शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत बरेचसे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. मोबाईलसहित इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट मतमोजणी केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीसोबतच व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाईल. प्रत्येक फेरीतील मतमोजणीनंतर पर्यवेक्षक, उमेदवारांचे एजंट सहमती देतील आणि स्वाक्षरी करतील. यानंतर निवडणूक अधिकार्याची स्वाक्षरी होईल.
मनाई आदेश जारी
मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात खासगी इसमांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यास येत आहे. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात शासकीय वाहने तसेच परवानगी दिलेली वाहने सोडून कोणत्याही प्रकारचे वाहन आत नेण्यास मनाई करण्यात येत आहे. मतमोजणी निकाल झाल्यानंतर मतमोजणी केंद्राचे 100 मीटर परिसरात घोषणाबाजी करण्यास, फटाके वाजाविण्यास, विजयी मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे. हा मनाई आदेश हा मतमोजणी दि.23 नोव्हेंबर रोजी 00.01 वा. पासून ते दि.23 नोव्हेंबर रोजी 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील.
राज्यात 288 जागांसाठी 8272 उमेदवार
मुंबई : राज्यातील 288 जागांसाठी 8272 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 10,900 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर 9260 उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता 8272 उमेदवार उरले असून, त्यांच्या भवितव्याचा फैसला 23 नोव्हेंबरला होणार आहे.
‘शिट्टी’चा आवाज घुमणार
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल आणि पनवेल मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांना मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. सर्व उमेदवारांची निशाणी शिट्टी असून, या शिट्टीचाच आवाज सर्वत्र घुमणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे नेत्यांसह सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.