। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कुणाला मिळणार ?यावरुन आमनेसामने आहेत. शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे. यावेळी शिवसेना पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये अशी विनंती शिवसेना करणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद आहे.
जेव्हा दोन गट एकाच निवडणूक चिन्हावर दावा करतात तेव्हा निवडणूक आयोग सर्वात आधी पक्षाचे संघटन आणि आमदार, खासदारांच्या गटाचे समर्थन तपासून घेते. त्यानंतर राजकीय पक्षात वरिष्ठ पदाधिकारी आणि निर्णय घेणाऱ्या समितीचे मत जाणून घेते. कुठल्या गटाकडे किती सदस्य अथवा पदाधिकारी आहेत ते तपास. त्यानंतर प्रत्येक गटातील आमदार, खासदारांची संख्या मोजली जाते. या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. निवडणूक आयोग संबंधित पक्षाचे चिन्ह गोठवू शकते.अशावेळी दोन्ही गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्ह नोंदणी करण्यासाठी सांगितले जाऊ शकते. जर भविष्यात दोन्ही गट एकत्र येत असल्यास त्या पक्षाचं मूळ चिन्ह त्यांना परत देण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकते.