कोण ठरणार पीएनपी चषकाचा मानकरी?

बुधवारी रंगणार अंतिम लढतीचा थरार

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्‌स अकॅडमी यांच्या पुढाकारातून पीएनपी चषक 2024 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.17) पासून कुरुळ येथील आझाद मैदानावर क्रिकेटचा थरार पहावयास मिळत आहे. बुधवारी 21 फेब्रुवारी अंतिम क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोण ठरणार पीएनपी चषकाचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह जिल्ह्यातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. 18 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. तिसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे आणि चौथ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या चार दिवसांपासून दिवस-रात्र सुरु असलेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्याचा आनंद प्रेक्षक मनमुरादपणे घेत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षिसाची स्पर्धा प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरत आहे.

प्रथम क्रमांकाला रोख पाच लाख व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख तीन लाख व चषक, तृतीय क्रमांकाला दोन लाख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणाऱ्या सामन्यात पीएनपी चषकाचा मानकरी कोण ठरणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version