विविध पक्षांकडून श्रेयवाद मिळविण्यासाठी बॅनरबाजी; खा. तटकरे यांच्याकडून योजनेचा शुभारंभ
। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा विभागात देखील अनेक गाववाडीवर आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. जलजीवन मिशन योजनेचा नागरिकांना मुबलक प्रमाणात लाभ मिळावा, याकरिता रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून खाडीपट्टा विभागात या योजनेसाठी विशेष तरतूद करून घेतली. मात्र कालांतराने ठाकरे सरकार पडल्यानंतर ही योजना ठप्प पडली. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा या योजनेचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणार्या भाजप आणि शिंदे गटाने देखील या गोष्टीला विरोध दर्शवत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी दिल्याचे मोठे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली.
यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. यामुळे जनता मात्र संभ्रमात असून नक्की श्रेय द्यायचे कुणाला, असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
श्रेयवादावरून रंगलेल्या या बॅनरबाजीत नुकत्याच येऊ ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे हे दोन्ही राजकीय पक्ष आपल्या स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त असून, योजनांचा मात्र दिखावाच होताना दिसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात 1 कोटी 42 लाख 36 हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल असे निर्देश तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र ठाकरे सरकार पडल्यानंतर ही योजना मध्यंतरी थांबली आणि नवीन सरकार येईपर्यंत राज्यातील विविध ग्रामपंचायतींना त्याची वाट बघावी लागली. आता मात्र ही योजना पुढे आली असून पक्षांतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.