। दिल्ली । वृत्तसंस्था ।
शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची? या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. आता निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.