ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

वर्षानुवर्षे अर्ज करूनही लाभ नाही; रमेश कदम यांचा उपोषणाचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

शासनाकडून ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी सन्मानाची योजना राबविली जात असताना, पात्र असूनही कर्जत तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कलावंत या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे अर्ज, पाठपुरावा आणि आश्वासनांनंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने आता या वंचित कलावंतांच्या न्यायासाठी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश शांताराम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 5 ऑक्टोबर 2026 रोजी लोकमान्य टिळक चौक, कर्जत येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या ‌‘शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत सन्मान योजने‌’ अंतर्गत ज्येष्ठ कलावंतांना मासिक अनुदान दिले जाते. मात्र, कर्जत तालुक्यातील पात्र कलावंतांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. ह.भ.प. भिकाजी पडवळ महाराज, ह.भ.प. शिवराम तुपे महाराज यांच्यासह इतर पात्र लाभार्थ्यांनी अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नासाठी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कर्जत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी रमेश कदम यांच्या उपोषणाची दखल घेत वंचित कलावंतांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याचे कदम यांनी म्हटले आहे. 2019 पासून अर्जाची पूर्तता न झाल्याने अनेक ज्येष्ठ कलावंत योजनेपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सन 2024-25 मध्ये 37 लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, अनेक वर्षांपासून अर्ज करून पाठपुरावा करणाऱ्या पडवळ आणि तुपे महाराज यांच्यासह काही वंचित पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसल्याचे कदम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवड प्रक्रियेची तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांत या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी, अर्जाच्या तारखा आणि आतापर्यंत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची वर्षनिहाय माहिती जाहीर करावी, अशीही मागणी कदम यांनी केली आहे. पात्र असूनही योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ कलावंतांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार रमेश कदम यांनी व्यक्त केला आहे. वंचित ज्येष्ठ कलावंतांनी आंदोलनासाठी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version