जिल्हा प्रशासन जे.एस.डब्ल्यू.ला का घाबरतं- पंडित पाटील

धरमतर ते वडखळ रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

धरमतर ते वडखळ रस्ता अतिशय नादुरस्त झाला आहे. ज्याप्रमाणे नादुरुस्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करता त्याप्रमाणे या रस्त्याचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला कामाला लावून लोकांना होणार्‍या त्रासापासून मुक्ती देण्याची गरज आहे. आज कंपनींचे हित जपणारे रायगड प्रशासनाचे अधिकारी जे.एस.डब्ल्यू. कंपनीला का घाबरतात, असा सवाल शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.

सातत्याने वडखळ ते धरमतर नादुरुस्त रस्त्यासाठी आवाज उठवणार्‍या शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या समस्येबाबत जिल्हा प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. महत्वपूर्ण असून देखील या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. हे काम करण्यात जिल्हा प्रशासन हतबल असून कोणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे.

पंडित पाटील यांनी सांगितले की, कंपनीसाठी ठेकेदार काम करायला तयार नसल्याचे समजले. मात्र कंपनी आणि जिल्हा प्रशासन लोकांना वेठीस का धरत आहेत? जिल्हा प्रशासन कंपनीवर का दबाव आणू शकत नाही? आपत्कालीन व्यवस्थापन कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित करीत पंडीत पाटील म्हणाले की, हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला असताना जिल्हाधिकारी कशात मश्गूल आहेत? या रस्त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे भरण्यास चालढकल करणार्‍या कंपनी प्रशासनाला जाब विचारला असता सांगितले जाते की आम्ही ठेकेदाराच्या शोधात असून निगोशिएशन करतोय. जर असे असेल तर जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत अवजड वाहतूक थांबवा, असेही त्यांनी म्हटले.

नॅशनल हायवे यंत्रणा गायब आहे. अधिकारी फोन उचलत नाही. रस्ता अत्यंत नादुरस्त झाला आहे. आज कंपनींचे हित जपणारे रायगड प्रशासनाचे अधिकारी जे.एस.डब्ल्यू. कंपनीला का घाबरते असा आरोप करतानाच सार्वजनिक रस्त्यावर जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या गाडया पार्किंग केल्या जातात त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. मात्र गरीब रिक्षावाल्याने काही वेळासाठी रस्त्यावर गाडी उभी केली तर त्याला लगेच दंड आकारला जातो. अशी दुटप्पी भुमिका घेणे योग्य नसल्याचे सांगून पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version