खारेपाटवासियांचा सरकारला सवाल
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या वाढील उद्धव योजना असफल का होतात, असा संतप्त सवाल खारेपाटवासियांनी राज्यकर्त्यांना केला आहे. दोन दिवसांपूर्वी पेण खारेपाटातील जागरुक नागरिकांनी मिटींगमध्ये खारेपाटातील महत्वाचा पाणी टंचाईचा विषय यावर करुन संघटनेनी प्रत्यक्ष शहापाडा धरणावर जावून पहाणी केली असता भयानक वास्तव समोर आले आहे. जे खारेपाटाच्या जनतेसाठी चिंता करायला लावणारे व या योजनेच्या मुळ उद्देशालाच काळीमा फासणारे असे आहे.
सध्या हेटवणेच्या पाण्याच्या टेस्टिंगचा भाग म्हणून मागील सात दिवसांपासून हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा ठिकाणी आणून शहापाडा धरणात न सोडता शहापाड़ा शहापाडा धरणाच्या मुळ जलवाहिनीला जोडून खारेपाटाला पाणी पुरवठा केला जात आहे. सोबतच शहापाडा धरणा लगत कालव्याचे पाणी तीन पंपा मार्फत उचलून शहापाडा धरणात सोडण्यात येत आहे. हेटवणेचे पाणी असेच पंपाद्वारे उचलून हेटवणे ते शहापाडा लाईनमध्ये सोडले जाते. हेटवणे पंप हाऊसची लाईट गेल्यावर हेटवणे धरणाचा वॉल बंद करून तेवढ्या वेळासाठी शहापाड्याचे पाणी खारेपाटाला दिले जाते. अतिविद्वान अभियंत्यांचा विद्वत्तेचा नमुना या सर्व प्रकारामुळे पहायला मिळत आहे, हे भयानक वास्तव आहे ज्याचा फटका खारेपाटाला भविष्यात सहन करावा लागणार आहे.
धैर्यशील पाटील यांची पदयात्रा
पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाटातील 29 गावे 43 वाड्यांना गेले कित्येक वर्ष पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते माजी आ. धैर्यशील पाटील यांनी पेण ते मुख्यमंत्र्यांचा बंगला अशी पदयात्रा फेब्रुवारी 2016 मध्ये काढून मुख्यमंत्र्यांचे लक्ष पेणकडे केंद्रीत केले होते.त्या मुख्यमंत्र्यांनी देखील मा. आमदार धैर्यशील पाटील यांची पूर्ण बाजू ऐकून तातडीने एमएमआरडी तून 40 कोंटीची तरतुद केली. नंतर या योजनेचा आरखडा तयार झाला आणि ती निधी 29 ते कोंटीच्या दरम्यान ठरली. 2016 ते 2022 या 6 वर्षाच्या काळात या योजनेचे काम कासवगतीने झाले .2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार रवी शेट पाटील यांनी रान पेटवले. मात्र, निवडून येउन 4 वर्ष उलटली तरी आता या योजने संदर्भात चकार शब्द काढायला तयार नाहीत. महत्वाची म्हणजे आपल्या मंत्रीपदाच्या काळात खारेपाटासाठी एक तांब्याभर पाण्याची सुध्दा योजना राबविता आली नाही. मात्र,मा. आमदार धैर्यशील पाटील यांनी आणलेल्या निधीचा राजकारण केले.
शडापाड़ा पाणी पुरवठा योजनेवर बोटावर मोजण्या इतकीच गावे सोडल्यास उर्वरित सर्वच गावांना जानेवारी पासुनच ट्रॅकरचे आणि गाव तलवांचे पाणी पिण्यासाठी व घरगुतीसाठी वापरावे लागत आहे. ही अडचण होण्यासाठी वाशी खारेपाट व शिर्की खारेपाटांतील नागरिक सतत आंदोलन करून पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नागरिकांची सततची मागणी, सततची आंदोलन याची दखल घेवून हेटवणे ते शहापाडा व शहापाडा ते पेण खारेपाट अशी जीवन प्राधिकरण विभागाकडून हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजना आहे. सदर योजना 2018 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी होता. परंतु निष्क्रीय ठेकेदार व बेजबाबदार अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे व संथगतीने काम करवून घेण्याच्या पद्धतीमुळे सदर योजना आज 2023 साल निघाले तरीही पूर्ण झालेली नाही. या पूर्वी योजनांसाठी पैसा उपलब्ध करु योजना पूर्ण करा अशी मागणी जनतेला करावी लागत होती. मात्र, प्रचंड पैसा, योजनेला मंजुरी असतांना योजना पूर्ण केल्या जात नाही ही प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट तर आहेच शिवाय सर्वच पक्षांच्या नेतृत्वाला मान खाली घालायला लावणारी व पेण खारेपाटाच्या नागरीकांसाठी दुर्दैवी बाब आहे.
हेटवणेचे पाणी शहापाड़ा धरणात सोडावे ही खारेपाटाच्या जनतेची मागणी आहे. शहापाड़ा धरणात हेटवण्याचे पाणी सोडले तर शहापाड़ा धरण भरलेले राहिल, सोबतच खारेपाटाची पाण्याची टंचाई दूर होऊन वाढत्या नागरीकरणाला या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होईल. सोबतच शहापाडा धरणावरील पेण खारेपाटाचा हक्क आबादित राहील. आता ज्याप्रकारे एमजीपी पाणी पुरवठा राजिप काम करत आहे त्यामागे कोणाचे डोके आहे माहित नाही पण खारेपाटाला पाणी पुरवठा करताना शहापाडा धरण वगळले तर शहापाडा वाढीव उद्भव योजना या योजनेच्या नावालाच काळीमा फासल्या सारखे होईल. ज्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील. आज जी एचडीपीएची लाईन टाकली आहे ती नादुरुस्त झाली तर त्याचे दुरुस्तीसाठीचे लागणारे साहित्यासाठी आजच आपल्याला मध्यप्रदेशवर अवलंबून रहावे लागत आहे. हेटवणे ते शहापाडा या सोळा किलोमिटरच्या एचडीपीए ची जलवाहीनी नादुरुस्त झाली किंवा पंपहाऊस मध्ये काही बिघाड झाला तर खारेपाटला पर्यायी पाणी साठा उपलब्ध असायला हवा यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात सोडणे हाच योग्य पर्याय आहे. प्रशासनाला जनतेच्या मागणी प्रमाणे योजना राबवायला लावण्यास खारेपाटाने संघटितपणे पाठपुरावा करावा लागणार आहे. अन्यथा या पाणी टंचाईचे चटके दुर होणार नाहीत. राजकीय चपला वाशी नाक्याच्या काढल्या नाहीत तर खारेपाटाला पुन्हा एकदा पाणी टंचाई पासुन कोणीही वाचवू शकणार नाही हेच सत्य आहे. सत्य कटू आहे मात्र सत्यापासून दुर पळता येणार नाही.