श्रीवर्धन शहरातील रस्ते रुंदीकरण गरजेचे; मुख्याधिकार्‍यांचे आवाहन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धनमधील रस्त्यांचे रुंदीकरण ही आता काळाची गरज बनली आहे. नागरिकांनीही मानसिकता बदलून रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्याधिकारी विराज लबडे यांनी केले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. श्रीवर्धन तालुक्यात कोणतेही ठिकाणी आलेला पर्यटक हा श्रीवर्धन समुद्रकिनार्‍याला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतो. मात्र शहरातील अरुंद रस्त्यांमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते व पर्यटकांची वाहने अनेक वेळ वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात. तसेच या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. स्थानिक नागरिकांना ज्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी लागणार त्या ठिकाणी 20 ते 30 मिनिटांचा कालावधी लागतो.

तीन वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरामध्ये रस्ते रुंदीकरणाबाबत सर्वे होऊन रस्ता कोणत्या सीमेपर्यंत रुंदीकरण केला जाईल याच्या खुणा सर्वत्र केलेल्या आहेत. श्रीवर्धन शहराच्या श्रीमंत पेशवे प्रवेशद्वारापासून शिवाजी चौक टिळक मार्ग मार्गे समुद्रकिनारा हा रस्ता सर्वात अगोदर रुंदीकरण होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन शहरात नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस पहाटेच्या वेळी व रात्रीच्या वेळी गावात येणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी एसटी राऊंडचा मार्ग देखील रुंदीकरण होणे तितकेच गरजेचे आहे. सदर एसटी राऊंडचा मार्ग देखील रुंदीकरण झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या समुद्रकिनार्‍याकडे जाण्यासाठी पर्यटकांना देखील सोयीचे होईल. ज्या नागरिकांचे रस्ता रुंदीकरण होताना नुकसान होणार आहे, अशा नगरपरिषदेकडून त्यांच्या जागेची किंमत तसेच किंमत नको असल्यास अधिकचे चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांनी काळाची गरज ओळखून आपली मानसिकता बदलावी व रस्ता रुंदीकरणासाठी सहकार्य करावे. असे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी विराज लबडे यांनी केले आहे.

सध्या श्रीवर्धन शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आलेला आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात येईल. तसेच श्रीमंत पेशवे प्रवेशद्वार ते शिवाजी चौक हा रस्ता लवकरच रुंदीकरणासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये ज्या नागरिकांचे नुकसान होणार आहे, अशांना नुकसान भरपाई नको असेल तर अधिकचे चटई क्षेत्र किंवा शहरात ठिकाणी बांधकाम करावयाचे झाल्यास त्या ठिकाणी चटई क्षेत्र देण्यात येईल.

विराज लबडे, मुख्याधिकारी
Exit mobile version