| पनवेल | प्रतिनिधी |
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नी व प्रियकराला पनवेल येथील अतिसत्र न्यायाधीश एस.सी. शिंदे यांनी जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितीदेवी हिचा विवाह हरिओम यांच्याशी झाला होता. दरम्यान, प्रितीदेवी हिचे गौरवसिंग याच्याशी प्रेमसंबंध होते. हे तिघेही कानपूर येथील राहणारे असून गौरवसिंह व प्रितीदेवी यांच्या प्रेमात हरिओमसिंगचा अडथळा असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्यासाठी त्याला पनवेल परिसरात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पळस्पे परिसरात आणले होते. तेथून पळस्पे येथील मोकल चाळ येथे भाड्याची रूम घेऊन दुपारी तिघेही रूममध्ये गेले. तिथे गौरवसिंग व प्रितीदेवी यांनी चाकूने हरिओमचा गळा चिरून व अनेक ठिकाणी वार करून खून केला. शेजाऱ्यांना भांडणाचा आवाज आल्याने शेजारच्या रूममधील साक्षीदारांनी दरवाजा ठोठावला. त्यावेळी प्रितीदेवी व गौरवसिंग रक्ताने माखल्याचे दिसले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पनवेल शहर पोलीसांना कळिवले. पोलीस तातडीने त्याठिकाणी पोहोचले असता पोलिसांना हरिओमसिंग जखमी व मृत अवस्थेत आढळला. आरोपीही तेथे सापडल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करून गुन्ह्याचा तपास चालू केला.
दरम्यान, दोन्ही आरोपीने उलटसुलट बचाव घेत गुन्हा केल्याचे नाकारले. हरिओमसिंग यांनी आत्महत्या केली असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष साक्षीदार नाही असे सांगून आरोपीच्या वकीलांनी खून कोणी केला? कसा केला? खून की आत्महत्या? असे संषयाचे भूत कोर्टासमोर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरकारी वकील वाय.एस. भोपी यांनी आरोपीच्या अंगावरील जखमा, मयताच्या अंगावरील जखमा, वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे खून असल्याचे कोर्टास पटवून दिले. घटनेच्या वेळी रूममध्ये तिघां शिवाय इतर कोणही नव्हते. अशा परिस्थितीत परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयास दाखवून दिला. यावेळी दोन्ही आरोपींनी खून केल्याचे न्यायालयाला पटवून दिले. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तीवाद मान्य करून दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.







