| पालघर | प्रतिनिधी |
नालासोपारा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः ही रेल्वेखाली जीव दिला. तबस्सुम खान (41) आणि माजिद खान (50) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. शनिवारी (दि.7) पहाटे घरात झालेल्या वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर माजिदने दुपारी मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकात आत्महत्या केली.
माजिद आणि तबस्सुम हे आपल्या मुलांसह नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून माजिद पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याने शनिवारी (दि.7) पहाटे पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादादरम्यान माजिदचा राग अनावर झाला. त्याने पत्नी तबस्सुम यांचा गळा आवळला. यात त्यांचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर माजिद घरातून निघून गेला. काही वेळाने त्याने मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानक गाठले. स्थानकात आलेल्या लोकलसमोर माजिदने उडी घेतली. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही घटनांचा तपास सुरू केला. पत्नीच्या हत्येप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
