9 बकर्या मृत तर 1 बकरी बेपत्ता
| रसायनी | वार्ताहर |
आपटा येथे 10 बकर्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला होण्याचा प्रकार घडला असून त्यात 9 बकर्या मृत तर 1 बकरी बेपत्ता झाली आहे. आपटा शासकीय आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्याकडे असलेल्या दर्ग्याशेजारी आकिब पिट्टू यांच्या फार्महाऊस आहे. येथे त्यांचे बंधू शेळीपालन करतात. पिट्टू यांनी रविवारी (10 जुलै) सकाळी 7:30 वाजता आपल्याकडील 14 बकर्यांना चरायला सोडले आणि ईदच्या निमित्ताने नमाज वाचण्यासाठी पिट्टू गेले.यानंतर सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान हिंस्त्र प्राण्यांनी 14 पैकी 9 बकर्यांवर हल्ला करून ठार मारले सून 1 बकरी कर्नांला अभयारण्याच्या जंगल दिशेने ओढत नेल्याचे दिसून आले.
दुपारी 11 नंतर गावातील तरुणाई या परिसरात फिरायला गेल्यानंतर त्यांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी पिट्टू यांना सांगताच त्यांनी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना सांगितले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देवून वनविभाग व पशुवैद्यकीय अधिका-यांना कळविले. यावेळी दुपारी 1:30 वाजता घटनास्थळी एच.टी.ढाकोल व त्यांच्या पथक तसेच पशुवैद्यकीय अधिका-यांनी भेट दिली. पाहणी केली असता मृत बक-यांवर जंगली कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने एकूण नऊ बक-या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले.तर दहावी एक बकरी बेपत्ता आहे.
हा तरस जातीचा प्राणी असल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी वर्तविला आहे. तसेच हा प्राणी एकटा नसून एकाहून अधिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. साधारणत: घटनेच्या आवारातील पाऊलांचे ठसे पाहून तरस किंवा बिबट्यासदृश्य इतर कोणतातरी प्राणी असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे. या प्रकारामुळे आपटा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक आर. बी. चव्हाण अहवाल सादर करणार आहेत. यावेळी वनरक्षक एस. डी. पाटील, अॅड.संजय टेबें, रसायनी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर आदीसह आपटा ग्रामस्थ उपस्थित होते.