रानडुकराच्या मादीसह पिल्लांना जीवदान

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीजवळील सायमाळच्या विरुद्ध दिशेला असलेल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना वन विभागाचे कर्मचारी राजेश खांडेकर आणि विकी घुटे यांना रानडुकराची मादी आपल्या पिलांसह जुन्या पाणी साठवण टाकीत पडलेली आढळली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तातडीने हेल्प फाऊंडेशनची मदत घेऊन तिला बाहेर काढण्यात यश आले.

हेल्प फाऊंडेशनच्या पथकाने सुरुवातीला रोपच्या साहाय्याने मादीला बाहेर काढण्याची तयारी केली. मात्र, ती आक्रमक झाल्याने तिला बेशुद्ध करून बाहेर काढण्याचा पर्याय विचारात घेण्यात आला. त्यासाठी पेट फोर्स, पुणेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थितीचा विचार करून मादीला बेशुद्ध करण्याऐवजी वापरात नसलेल्या टाकीची भिंत तोडून बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. दरम्यान, टाकीत अडकलेल्या मादीचा आणि पिल्लांचा आकांत ऐकून परिसरात रान डुकरांचा एक मोठा कळपही घटना स्थळाच्या जवळ वावरताना दिसत होता. बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने पिल्लांना बाहेर काढले, तर टाकीची भिंत तोडून तयार केलेल्या मार्गातून मादीही सुखरूप बाहेर पडून आपल्या अधिवासाच्या दिशेने निघून गेली. दुर्दैवाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तीन पिल्लांपैकी एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. या मोहिमेत हेल्प फाऊंडेशनच्यावतीने गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, निलेश यादव, पंकज बागुल, निखिल ढोले, सुनील पुरी, भक्ती साठेलकर, साईश सुनील पुरी आणि धनंजय शिद सहभागी झाले होते. पेट फोर्स, पुणे येथील सदस्यांनीही बचावकार्यात सहकार्य केले. वन विभागाचे कर्मचारी राजेश खांडेकर आणि विकी घुटे यांच्या समन्वयातून ही मोहीम पुढे सरकली.

Exit mobile version