शेतातील भातपिकांचे अतोनात नुकसान
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धसाखोशी येथील भातशेतीमध्ये रान डुकरांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत धसाखोसी येथील शेतकऱ्यांनी उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रशासक विनोद मिंडे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातंगे यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर भात शेतीच्या नुकसानी बाबत कैफियत मांडून या रान डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन दिले आहे.
सध्या बियाणे, रासायनिक खते व मजुरीच्या संख्येत नियमित न परवडणारी होत असलेली वाढ आणि पावसाचा भरोसा लक्षात घेता भातशेतीचे पिक घेणे अतिशय जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा हैराण झाले आहेत. मात्र, आपल्या पूर्वजांनी आजतागायत शाबूत ठेवलेली काळी आई तथाकथीत भांडवलदाराच्या घशात न घालता त्याची दरवर्षी मशागत करून भातशेतीचे पिक घेतले जाते. मात्र, या आता रान डुकरांचा हैदोस वाढला असून हातातोंडांशी आलेल्या भातपिकाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपासून विकासाच्या नावाखाली येथील डोंगर पोखरल्यामुळे जंगलात आदीवास करणाऱ्या वन्य प्राण्यांना आता आश्रय व संरक्षण राहिलेले नाही. जंगल परिसरात दरवर्षी बेसूमारपणे आगीचे वणवे लावण्याचे कारस्थान समाज कंटकांकडून केले जात आहे. त्यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
त्यांचे जनजीवन उद्ध्वस्त होत असल्याने जंगलातील रानडुकरांनी खाडीकिनारी आपला मोर्चा वळविला आहे. अगदी पेण तालुक्यातील रावे, दादर, उर्णोलीसह उरण तालुक्यातील केळवणे, पुनाडे वशेणी, आवरे, कडापे गोवठणे, खोपटे येथील खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या वृक्षांची पाने व खाडीतील खेकडे आणि मासळी खाण्यासाठी त्यांनी तेथेच वास्तव्य करून राहणे निश्चित केले आहे. त्यामुळे धसाखोशी येथील खाडीत असलेली रानडुकरे रात्रीच्या काळोखात कळपाने वावरून अनेकांच्या शेतातील भातपिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे या रान डुकरांचा वेळीच बंदोबस्त करून येथील शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धसाखोशी येथील भातशेतीत रान डुकरे नुकसान करीत आहेत. या शेतकऱ्यांच्या तक्रारी बाबत महसूल विभागाचा विषय असल्याने तातडीने उरणचे तहसीलदार आणि कोप्रोली मंडळ अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
राजेंद्र सातंगे,
ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा







