| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील बोरघर परिसरात रानडुकरांचा प्रचंड हैदोस सुरू असून, या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेले भात पीक, कारले, भेंडीसह विविध पिकांची संपूर्ण नासधूस झाली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
यशवंत भगत यांच्या शेतात नुकतेच रानडुकरांनी हाहाकार माजवून सुमारे 80 ते 85 टक्के भात पिकाचे नुकसान केले आहे. या संदर्भात तालुक्याचे वनविभागाचे मुख्य अधिकारी दबडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत अर्ज करावा. त्यासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक या कागदपत्रांच्या प्रती जोडून द्याव्यात. प्राप्त अर्जांच्या आधारे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल अशी माहिती दिली, दरम्यान, बोरघर व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी प्रशासन व वनविभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, तसेच रानडुकरांच्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. आमच्या मेहनतीचा घास हिरावला गेला आहे; आता प्रशासनाने तरी न्याय द्यावा बोरघर येथील सर्व शेतकऱ्यांची आर्त मागणी.







