जंगली फळांचा हंगाम झाला सुरू

बाजारात फळांची आवक

| नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या जंगलात चैत्र महिना सुरू झाला की जंगलातील जंगली झाडांना फुले आणि फळे येण्याचा हंगाम सुरू होतो. जंगलातील फळे ही माथेरानकरांसाठी औषधी ठेवा असतो. त्यामुळे माथेरानमधील तरुण आणि स्थानिक आदिवासी हे या फळांचा आस्वाद घेण्यासाठी जंगलात फिरताना दिसत आहेत.

माथेरानमधील झाडांची पालवी देखील खुलली असून झाडांनी नवीन वेष परिधान केला आहे. त्यामुळे झाडांवरील पाने नवनवीन रंगांनी फुलून गेलेली असून त्यामुळे जंगलात अधिक वेगळे वातावरण अनुभवास मिळत आहे. त्यात माथेरान मधील जंगलात आढळणारी जंगली झाडे यांना लागणारी फुले, फळे ही वेगळी अनुभूती देत असतात. जंगलात अटक आठुरणे, फणशी,आसाना, तोरणे, जांभूळ, करवंदे आदी जंगली फळे यांचा हंगाम सुरू झाला आहे.

कमी प्रमाणात असला तरी यापैकी अनेक झाडांना लागलेली फुले ही फळामध्ये रुपांतरीत झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे माथेरानमधील हौशी तरुण आणि स्थानिक आदिवासी हे जंगल भागात फिरून फळांचा शोध घेवू लागले आहेत. त्या फळांमधील अटक, आसाणा ही माथेरान आणि महाबळेश्‍वर शिवाय अन्य कुठेही जंगलात मिळत नाही आणि त्यामुळे पर्यटक देखील या फळांची खरेदी करण्याचा आवडीने प्रयत्न करीत असतो

Exit mobile version