जंगल संपत्तीच्या र्‍हासामुळे रानमेवा दुर्मिळ

। खांब । वार्ताहर ।

जंगल संपत्तीच्या र्‍हासामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तयार होणारा व प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा रानमेवा मिळविण्यासाठी फार मोठी धडपड करावी लागत आहे. वाढते औद्योगिककरण व शहरीकरणामुळे जंगलाची बेसुमार कत्तल केली जात आहे. तर, अनादी काळापासून मानवाने इंधन व घरगुती वापरासाठी जंगल संपत्तीची लूट चालविली आहे. त्यातच भरीस भर म्हणून जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे दिवसेंदिवस जंगलांची संख्या कमी कमी होऊ लागल्याने त्याचा परिणाम जंगल संपत्तीवर होऊ लागला आहे. जंगलाच्या आश्रयाला व प्रत्यक्ष जंगलात राहणार्‍या बहूतांश लोकांचा उदरनिर्वाह हा जंगलावरच अवलंबून असल्याने जंगल संपत्तीच्या र्‍हासाचे परिणाम त्यांनाही भोगावे लागत आहेत.

ऊन्हाळ्यात जंगल भागात तयार होणारे आंबे, काजू, फणस, करवंदे, जांभळे, फणस आदी रानमेवा मिळविण्यासाठी सद्य स्थितीत फार मोठी धडपड करावी लागत असल्याचे आदिवासी भगिनींकडून सांगण्यात आले आहे. तर, सततची होणारी वृक्षतोड व जंगलात लावले जाणारे वणवे याचाही परिणाम रानमेव्यावर होऊ लागल्याने रानमेवा मिळण्याचे प्रमाणही कमी झाले असून रानमेवा मिळविण्यासाठीची धडपडही फार मोठी वाढली असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version