ओल्या काजूगरांच्या हंगामाला सुरुवात; खवय्यांची झुंबड
| पाली | प्रतिनिधी |
कोकणचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेला काजूगर हंगामाची सुरुवात झाली आहे. आदिवासी महिला हा रानमेवा विकायला घेऊन येत असून, तब्बल 300 ते 400 रुपये शेकड्याने काजूगराची विक्री होत आहे. चढ्या भावात ही खवय्ये खरेदीसाठी लगबग करत आहेत.
जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगराळ भाग व जंगलामध्ये काजूची झाडे विपुल प्रमाणात आहेत. अनेक बागायतदारांच्या स्वतःच्या खासगी काजूच्या बागादेखील आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून या झाडांवर काजूच्या बिया येतात आणि या बिया तोडून त्यातील काजूगर काढून आदिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेऊन येतात. काजूगराच्या हंगामाची नुकतीच सुरुवात झाली असल्याने त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी, त्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. जून महिन्यापर्यंत ओल्या काजूगराचा हंगाम असतो. येथे येणारे पर्यटक काजूगराचे पदार्थ मोठ्या आवडीने खातात व विकत घेऊन देखील जातात. काजूगर विकून आदिवासींच्या हातात चांगले पैसे मिळतात.
भाव आणि विक्री
माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणी काजूगराच्या बिया शेकड्याने मिळतात, तर पाली, रोहा, पेण आदी ठिकाणी या बिया वाट्यावर मिळतात. मध्यम आकाराचा वाटा 50 रुपये इतका आहे. ज्यामध्ये 10 काजूगर उभे कापून ठेवलेले असतात. खवय्ये मात्र चढ्या भावानेदेखील काजूच्या बिया खरेदी करत आहेत. साधारण महिनाभरानंतर उत्पादन वाढल्यावर काजूगर मुबलक उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचा भावदेखील कमी होईल.
चविष्ट काजूगराची घ्या मज्जा
चविष्ट काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात. काजूगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करून खाल्ली जाते. पुलाव व बिर्यांनीदेखील केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकूनसुद्धा खाल्ले जातात. असे हे चिविष्ट आणि स्वादिष्ट काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.
काजूगर काढताना आदिवासींची मेहनत
आदिवासीबांधव अनवाणी उन्हातान्हात काजूगर काढण्यासाठी जातात. या काजूगराच्या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदिवासीबांधव बिया काढतात. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे आणि सहाय्य करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.







