चिरनेर गावात जंगली वानरांचा उच्छाद

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेर गावात जंगली वानरांनी घरांच्या छपरांवर उड्या मारून उच्छाद मांडला असून, ही जंगली वानरे गेल्या सात ते आठ दिवसांपासून गावात घुसली आहेत. दरम्यान, कळपाने धुडगूस घालणारी हि सात ते आठ वानरे असल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे. तसेच, या वानरांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी चिरनेर ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी डोंगर पोखरून मातीचे उत्खनन झाले आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले असून, त्यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. त्यामुळे त्यांना अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या वानरांनी गावात प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याचा त्रास आता गावकर्‍यांना सहन करावा लागत आहे. ही वानरे घरांच्या छपरांवर उड्या मारून घरांचे नुकसान करत आहेत. शिवाय पावसापासून घराचे संरक्षण व्हावे यासाठी वापरण्यात आलेली ताडपत्रीही फाडून टाकत असल्यामुळे घरांना गळती देखील लागली आहे. त्याचबरोबर घराच्या आवारातील फळ झाडांवरील नारळ, पेरू, चिकू, सिताफळ तसेच इतर फळे ही वानरे खाऊन फस्त करत आहेत.

Exit mobile version