। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर या गावात जंगली वानरांनी घरांच्या छपरांवर उड्या मारून उच्छाद मांडला आहे. ही जंगली वानरे गेल्या अनेक महिन्यांपासून गावात घुसली आहेत. उच्छाद मांडणारी ही सात ते आठ वानरे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, घरांच्या छपरांचे नुकसान करणार्या या वानरांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी चिरनेर ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरणाचे काम सुरू आहे. नवनवीन प्रकल्प या भागात राबविले जात आहेत. त्यामुळे येथील डोंगर, जंगले आता उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जंगली वानरे चिरनेर गावातील घरांच्या छपरांवर उड्या मारून घरांचे नुकसान करत आहेत. पावसाच्या हंगामाला अवघे काही दिवस उरले असताना, ही जंगली वानरे घरांच्या छपरांवर उड्या मारून पत्रे, कौले फोडत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. जंगली वानरांच्या उच्छादाला येथील नागरिक कंटाळले आहेत. वनविभागाने या वानरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार येथील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, या तक्रारींकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.