पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा आहे, त्यामुळे महिला व नागरिकांची कुचंबना होताना दिसून येत आहे. नैसर्गिक विधी करायचा कुठे, महिला पुरुषांची अक्षरश तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती झाली आहे.
शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पाली शहर गजबजलेले असते. सुधागड तालुक्यातील व तालुक्याबाहेरील नागरीक रोजची खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी , रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तसेच तीर्थक्षेत्र असल्याने असंख्य भाविक देखील पालीत नियमित येत असतात. मात्र बाजारात फिरतेवेळी किंवा कुठे जातांना नैसर्गिक विधी करायचा झाल्यास कुठे जावे हा प्रश्‍न त्यांना पडतो. कारण पालीत कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुतार्‍या नाही आहेत. विशेषतः यामध्ये महिलांची अक्षरशः कुचंबना होते. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वछतागृह नाहीत ही खूप मोठी समस्या आहे.त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी तसेच नाक्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतार्‍या बांधाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रश्‍नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी संवेदनशील भावनेने पाहिलं का? व ही समस्या सोडवली जाईल का? हा खरा सवाल आहे.

Exit mobile version