| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पं.हद्दीतील वन विभागाने जतन केलेल्या जंगलाला अज्ञाताने लावलेल्या वणव्यात होरपळले असून बरीचशी झाडे जळून खाक झाली आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी येथील ग्रा.पंचायत हद्दीतील तळवली तर्फे अष्टमी व चिल्हे या दोन गावच्या सीमेवर असलेल्या मोकळ्या माळरानावर रोहा तालुका वन विभागाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे रोपांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.दरम्यानच्या काळात वन विभागाने चांगली देखभाल करून सदरची सर्व झाडेही चांगली वाढल्याने येथील वृक्षारोपण केलेला सर्व ओसाड भाग हा हिरवागार झाला.परंतू एखाद्या चांगल्या गोष्टीला दृष्ट लागावी तसा प्रकार लावण्यात आलेल्या वणव्यामुळे या जतन केलेल्या जंगलाच्या बाबतीत घडला असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







