वीस पोती कचरा संकलित; 61 विद्यार्थ्यांचा सहभाग
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
“अधिवास जोडूया, वन्यजीवांचे संवर्धन करूया” या संकल्पनेतून दि.2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम स्वर्णसृष्टी हॅबिटॅट रिस्टोरर फाउंडेशन, स्नेक अवेअरनेस असोसिएशन, वन विभाग पनवेल आणि खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओवे हिल्स, हायडपार्कसमोर स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत कॉलेजच्या तब्बल 61 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पनवेल वन विभागाचे सहायक वनरक्षक सागर माळी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन पानपाट्टे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, अधिवासाचे तुकडीकरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे वन्यजीवांवर होणाऱ्या परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात प्लास्टिक, काच, कचरा आणि इतर घातक वस्तू मोठ्या प्रमाणात फेकल्या जातात. या वस्तूंमुळे वन्यजीवांना दुखापत होण्याबरोबरच अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे निसर्ग स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर वन्यजीव संरक्षणाचीही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे देखील सांगण्यात आले.
दरम्यान, ‘चला, निसर्ग जपूया, वन्यजीव वाचवूया आणि भावी पिढीसाठी समृद्ध जैवविविधता सुरक्षित ठेवूया’, असा संदेश देत वन्यजीव सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वर्णसृष्टी हॅबिटॅट रिस्टोरर फाऊंडेशनच्या ज्योती नाडकर्णी, रायगडचे मानद वन्यजीव रक्षक रघुनाथ जाधव तसेच वन विभागाच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली सहभागी स्वयंसेवक पाच वेगवेगळ्या दिशांनी डोंगर परिसरात पसरले. त्यांनी परिसराची पाहणी करून मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित केला. या स्वच्छता मोहिमेत तब्बल 20 पोती कचरा गोळा करण्यात आला. डोंगर परिसरात प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकणाऱ्यांमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला निर्माण होणारा धोका यामुळे पुन्हा अधोरेखित झाला.
