जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचा निर्धार
पनवेलमध्ये कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप
पनवेल तहसील व अन्नदा संस्थेचा उपक्रम
। पनवेल । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातून कुपोषणाला हद्दपार करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केला असून, कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. कातकरी उत्थान अभियानांर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचा प्रारंभ पनवेल तालुक्यातील सुकारपूर येथून करण्यात आला. पनवेल तहसील आणि अन्नदा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कुपोषित व कमी वजनाच्या बालकांना पोषण पोटलीचे वाटप करण्यात आले.

पोषण पोटलीमध्ये सुष्म मिश्रीत मकई, सोया, व गहू यांचे लाडू, डाळ, सोया व मल्टिग्रेन खिचडी व चिवडा चिक्की, भाजलेले चणे, राजगिरा, खजूर रोल, चित्रकला पुस्तके, कलर फेस मास्क या सर्व वस्तूंचा सामावेश करण्यात आला आहे. पोषण पोटलीचे सुकापूर भागात तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी चेतन गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी उपस्थितांना आहार, आरोग्य व स्वच्छता या विषयाबाबत मार्गदर्शन केले. तसेच बेटी बचाव बेटी पढाव शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला अन्नदा संस्थेचे संजय मिश्रा, महिला विकास संस्थेकडून म्हात्रे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घरत, तलाठी जोशी, ग्रामविकास अधिकारी सुदिन पाटील, पर्यवेक्षिका तांडेल व गांधी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सप्तसुत्री अन्वये मालडुंगे तालुका पनवेल येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये एमजीएम हॉस्पिटल, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यामधील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.
