| धाटाव | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचार व खूनप्रकरणी गुरुवारी (दि.28) माणगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडून अखेरचा युक्तिवाद करण्यात आला. पीडितेला न्याय मिळवून देणार, असा विश्वास ॲड. निकम यांनी व्यक्त केला. दरम्यान, झालेल्या युक्तिवादानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ॲड. निकम यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
तांबडी येथे सायंकाळदरम्यान शेतावरून आपल्या आजोबांना घरी आणण्यासाठी गेलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह रात्री उशिरा आढळून आला होता. पोलीस तपासात सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर अत्याचार व खूनप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा, स्थानिक सकल मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता. आरोपींना तात्काळ अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक चालवा, असा सर्वच स्तरातून पोलीस यंत्रणेवर दबाव वाढल्याने अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाची दखल गृहविभागाला घ्यावी लागली आणि आरोपींनाही अटक करण्यात आले. तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅकद्वारे चालविण्याची आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची मागणी केली होती.
याबाबत गुरुवारी माणगाव येथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या ॲड. उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीची आई, मामा, आत्या, आजोबा यांसह सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, संदीप सावंत, प्रशांत देशमुख, उदय शेलार, स्वप्नील शिंदे, समीर मोरे यांसह समाज बांधवांनी भेट घेऊन याप्रकरणी कृतज्ञता व्यक्त केली. याठिकाणी माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी सर्वच पुराव्यांसह युक्तिवाद झाला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनीही तपासात चांगली कामगिरी दाखविली असल्याने निकाल प्रक्रियासुद्धा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पीडितेलाही न्याय मिळेल, असा ठाम विश्वास ॲड. उज्ज्वल निकम यांनी याप्रसंगी दिला.





