। मुंबई । प्रतिनिधी ।
जलसंपदा विभागामार्फत पुढील दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.
महसूल, वन, जलसंपदा, उद्योग, ऊर्जा व कामगार, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पाटील बोलत होते.
जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, डावा-उजवा कालव्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रमुख कालवा ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. गोदावरी खोर्यात प्रवाह वळण योजनेद्वारे पाणी वळविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी नदीजोड प्रकल्प राबविले जात आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामे तातडीने सुरु करुन पूर्णत्वास नेले जातील. निम्न माणिकडोह प्रकल्पाचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे याला कोणाचाही विरोध नाही. मंत्रिमंडळही याबाबत सकारात्मक आहे. निळवंडे कालव्याचा प्रश्न सुटला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असून या कामाला प्राधान्य दिले आहे. तसेच जीगाव प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत तातडीने बैठक घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.
अनेक सुविधा ऑनलाईन
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महसूल विभाग सर्वसामान्यांशी निगडित विभाग असून या विभागांतर्गत अनेक कामे केली जातात. ही कामे सहजतेने आणि बिनचूक झाली पाहिजेत, अशी शासनाची भूमिका असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन 2024 पर्यंत विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होतील. त्याचबरोबर सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा नवीन सातबारा ऑनलाईन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच पदे भरली जातील.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील प्रत्येक नगरपंचायतीमध्ये स्वतंत्र हेल्थ केअर सेंटर असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल कॅन्सर डायग्नॉसिस व्हॅन दिल्या जाणार आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय, सिटीस्कॅन, डायलिसिस साहित्य, टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या चर्चेत सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष जैस्वाल, संजय कुटे, सुनिल शेळके, सुनिल प्रभू, माधुरी मिसाळ, तुषार राठोड, प्रकाश आबिटकर, सरोज अहिरे, राहुल पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.