उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्पष्ट भूमिका
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आले आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीतून निवडणूक लढविली जाणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या उमेदवारांबाबत शेकापच्या नेतेमंडळींसोबत चर्चा झाली आहे. वाटाघाटी चालू असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले. याबाबत नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, सतीश पाटील, संदीप पालकर, तनुजा पेरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भोईर यांनी सांगितले की, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्यावतीने नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी झाली आहे. उमेदवारांची पडताळणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. अलिबाग नगरपरिषदेचा विचार करता, नऊ ते दहा इच्छुक उमेदवारांची नावे देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी कामे केली आहेत, सेवा केली आहे, त्या तीन ते चार सक्षम उमेदवारांचा विचार करून हक्काचे प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी आमची भूमिका आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे. मतदारांची मानसिकता व कामे यांचा विचार करून उमेदवार निवडून आणून सत्ता स्थापन करता येईल, याचा विचार बैठकांमध्ये करण्यात आला आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच अलिबाग नगरपरिषदेतील शेकापचे नेते मंडळीसोबत चर्चा झाली आहे. चर्चेच्या वाटाघाटी चालू आहेत. सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यावर लवकरच भूमिका स्पष्ट होणार असल्याचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले.







