| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी पनवेल आणि उरणमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीतूनच लढणार, अशी घोषणा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि.17) शेकाप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्वरीत आपण महाविकास आघाडीची बैठक घेत आहोत आणि त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद, पनवेल व उरण पंचायत समिती, पनवेल महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जागा वाटपांबाबत विचार विनिमय करणार आहोत. तसेच, पनवेलमधील रस्त्याचे काम अगदीच निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात हे रस्ते उखडले गेलेत आणि आता तेच कॉन्ट्रॅक्टर सांगत आहेत की आम्ही स्वखर्चाने रस्ते दुरुस्त करून देऊ. याचा अर्थ असा की, या रस्त्याच्या कामामध्ये कितीतरी मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, गोपाळ भगत, शंकर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.






