कोळी बांधवांच्या प्रश्नांसाठी लढणार: आमदार रोहित पवार 

| उरण | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेतृत्व तथा आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि. 3) उरण तालुक्यातील करंजा जेट्टी येथे सदिच्छा भेट देत स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोटीने समुद्रात फेरी मारत पारंपरिक मासेमारी व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कोळी समाजासमोरील विविध अडचणी जाणून घेतल्या.

करंजा गावात आगमन होताच आमदार रोहित पवार यांचे जागृत द्रोणागिरी मातेच्या मंदिरासमोर उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या कार्यालयात पदाधिकारी व कोळी समाजातील प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मासेमारी व्यवसायासमोरील अडचणी, समुद्रातील वाढते निर्बंध, विविध प्रकल्पांमुळे होत असलेले नुकसान तसेच मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणारे परिणाम याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर आमदार पवार यांनी बोटीने समुद्रमार्गे जलप्रवास करत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करताना येणाऱ्या अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, मत्स्य व्यवसायावर होत असलेले परिणाम आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

काँग्रेस मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी निवेदन सादर करत मच्छीमार समाजाची होत असलेली पिळवणूक आणि विविध प्रलंबित प्रश्न आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सर्व बाबी समजून घेत संबंधित विभाग आणि शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागेल, मात्र योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यास आपण कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उरण दौऱ्याबाबत बोलताना अनेक महिन्यांपासून उरणला भेट देण्याची इच्छा असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. विविध कारणांमुळे हा दौरा पुढे ढकलला जात होता. अखेर उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या प्रयत्नांमुळे हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केले. यावेळी सीताराम नाखवा, के. एल. कोळी, नगरसेविका नाहिदा ठाकूर, प्रार्थना म्हात्रे, भालचंद्र घरत, नाना नलावडे, भूषण घरत, चेतन म्हात्रे, मुकेश थळी, देविदास थळी, मनोहर थळी यांच्यासह कोळी समाजातील अनेक मान्यवर व मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजा येथील या संवाद दौऱ्यामुळे कोळी बांधवांच्या प्रश्नांना राजकीय पातळीवर नव्याने वाचा फुटली असून, मच्छीमार समाजाच्या विविध मागण्यांबाबत पुढे काय निर्णय होतात याकडे आता उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Exit mobile version