भारत- ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरी हॉकी लढत
| पर्थ | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिंपिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय पुरुष हॉकी संघाला सपाटून मार खावा लागला. आता दोन देशांमधील तिसरा सामना होणार असून सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार असून त्यामुळे मालिकेतील आव्हानही कायम राहणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियन संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. यजमान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या लढतीत भारतीय संघाचा 5-1 असा धुव्वा उडवला. त्यानंतर दुसर्या लढतीत भारतीय संघाचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. पहिल्या दोन लढतींत भारतीय संघाकडून निराशाजनक कामगिरी झाली.
मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन याप्रसंगी म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून या मालिकेत भारतीय संघ कमकुवत बाजूंवर विशेष लक्ष देईल, असे प्रकर्षाने दिसून येत आहे.कर्णधार हरमनप्रीत सिंग स्वत: बचावफळीत खेळत असून पहिल्या दोन्ही लढतींत भारतीय संघ या विभागात ढिसाळ कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन हॉकीपटूंना पेनल्टी कॉर्नरवर तसेच फिल्डमध्ये सहज गोल करता येत आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय हॉकीपटूंना आक्रमक फळीतही अपयशाला सामोरे जावे लागत आहे. मनदीप सिंग, अभिषेक, ललितकुमार उपाध्याय, गुर्जंत सिंग व सुखजीत यांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा. पहिल्या दोन लढतींत त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आलेले नाही. भारतीय हॉकीपटूंनी मधल्या फळीत समाधानकारक कामगिरी केलेली आहे.
विविध योजनांचा अवलंब भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन या मालिकेत विविध योजनांचा अवलंब करताना दिसत आहे. काही नवे प्रयोगही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. हॉकीपटूंनी छोट्या पासेसवर लक्ष द्यावे, असे त्यांना वाटत आहे. पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट खेळाडूंनी थेट स्ट्राईक करीत गोल करावा, यासाठी ते आग्रही आहेत. भारतीय संघाकडून पहिल्या दोन लढतींत प्रयोग करण्यात आले खरे; पण त्यांना ऑस्ट्रेलियाचा बचाव अद्याप भेदता आलेला नाही.भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या तिसरी लढत होणार असून त्यानंतर (दि.12) एप्रिल रोजी चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. तसेच दोन देशांमधील पाचवा सामना (दि.13) एप्रिल रोजी पार पडणार आहे.