सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल; मुख्याध्यापक, अधीक्षिकांवर निलंबनाची कारवाई
। कर्जत । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधे दिल्याने इयत्ता चौथीत शिकणार्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुशबूच्या मृत्यूनंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आदिवासी विकास विभागाने त्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, त्या नऊ वर्षाच्या मुलीला चुकीची औषधे देणार्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर शासन कारवाई कधी करणार? पोलिसांची कारवाई आकस्मिक मृत्यूच्या पुढे जाणार आहे की नाही, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षीय आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी कुष्टरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथकाने खुशबूला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागले होते. त्यामुळे खुशबूला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, नंदा म्हात्रे आणि कर्जत येथील जैतू पारधी यांनी आवाज उठवला होता. हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला. त्यावेळी आमदार ओगले यांनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभाग तसेच आदिवासी विकास यांच्याकडून कारवाईची मागणी केली होती. अर्थसंकल्पू अधिवेशन सुरु असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना निलंबित केले आहे.
पोलिसांच्या आदेशांनंतर देखील अहवाल नाही
22 जानेवारी रोजी खुशबू ठाकरे हीचा मृत्यू झाला होता. त्याबाबत पेण पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूबद्दल 28 जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर खुशबू हीचा मृत्यू चुकीची औषधे दिल्याने झाला असल्याने या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना खुशबू प्रकरणी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र, दिड महिन्यात या दोन्ही अधिकार्यांचा अहवाल पेण पोलिसांना प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे संबंधित दोषींवर गुन्ह्याची कार्यवाही होऊ शकली नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे.
आदिवासी समाजात भीती
पेण तालुक्यातील आदिवासी समाज अत्यंत हलाखीची स्थितीत जगात आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील लोक मुलांना आश्रमशाळेत पाठवत असतात. मात्र, पेण तालुक्यात दोनवेळा आदिवासी समाजाच्या मुली आश्रमशाळेत गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आदिवासी समाजात आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत पाठवण्याबाबत भीती वाटू लागली आहे
डॉक्तरांवर कारवाई कधी?
कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाकडून खुशबूला चुकीच्या औषधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यामुळे अशा डॉक्टरांवर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील सामाजीक कार्यकर्त्यांकडून होत आहे.