पनवेल महापालिकेचा स्तुत्य उपक्रम
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) माध्यमातून साडेचार महिन्यांत भटके श्वान आणि मांजरींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नुकताच यासंदर्भातील अहवाल पालिका आयुक्तांना पालिकेच्या पशुवैद्याकीय अधिकार्यांनी सादर केला आहे.
राज्य व देशपातळीवर भटके श्वान आणि मांजरींचे ए.आय. माध्यमातून सर्वेक्षण करणारी पनवेल ही पहिली महापालिका ठरली आहे. पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आणि पालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांच्या कारकीर्दीत या सर्वेक्षणाच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती. पालिकेने 19 लाख रुपये खर्च करून श्वानांचे रेबीज निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम योजनेअंतर्गत झायमॅक्स टेक सोल्युशन या कंपनीला इंडिया केअर तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. सर्वेक्षणासाठी कंपनीने प्राणीशास्त्र विषयातील 20 पदवीधर तरुणांना नेमले होते. यावेळी पनवेल पालिका क्षेत्रातील 20 वेगवेगळ्या प्रभागांचे 195 परिभाग करून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. एकाच रस्त्यावर, एकाच गल्लीत किंवा एका सोसायटीत तीन दिवस त्याच वेळी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण अहवालामध्ये पालिका क्षेत्रात सुमारे 19 हजार भटके श्वान आणि 5 हजारांहून अधिक मांजरी असल्याचे वर्तविण्यात आले आहे. तसेच, पनवेलमध्ये सुमारे 9 हजार पाळीव श्वान असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
रेबीजमुक्त पनवेल पालिका ही मोहीम राबविताना भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे. 40 टक्क्यांहून अधिक श्वानांचे पनवेलमध्ये निर्बीजीकरण झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
मंगेश चितळे,
आयुक्त, पनवेल पालिका
श्वानांचे लसीकरण, अपघातांवरील नियंत्रण, जन्मदरावर सूक्ष्म नियंत्रण करण्यासाठी कुठल्या प्रभागातील किती श्वान आहेत याची माहिती मिळेल. तसेच, पालिका सात वर्षांपासून निर्बीजीकरण करत असून त्याची फलनिष्पती समजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
डॉ. वैभव विधाते,
उपायुक्त